उपोषणाला बसताच टँकर सुरू ; जिल्हा परिषदेच्या जवळा (ता.जामखेड) गटातील टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू क...
उपोषणाला बसताच टँकर सुरू ;

जिल्हा परिषदेच्या जवळा (ता.जामखेड) गटातील टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी जि.प. सदस्य दत्तात्रय वारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जामखेड तहसीलसमोर या गावातील सरपंचांनी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. जामखेड : जवळा जिल्हा परिषद गटातील २३ गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने प्रस्ताव व निवेदन देऊनही टँकर सुरू करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी गटातील सरपंचांसह जामखेड तहसीलसमोर उपोषण सुरू करताच तासाभरात प्रशासनाने तातडीने सहा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले. यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील अरणगाव, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, नान्नज, गोयकरवाडी, बोर्ले, मतेवाडी, डोणगाव या परिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. त्यामुळे या गावात टँॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी बोर्लेचे सरपंच भारत काकडे, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, हळगावचे सरपंच राजेंद्र ढवळे, खांडवीचे सरपंच नरेंद्र जाधव, जवळा सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी तहसीलदार व गटविकास अधिकार्यांना ५ऑगस्टला निवेदन व प्रस्ताव देऊन टँॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची, तसेच कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी जवळा व चौंडी बंधार्यात सोडण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाकडून चालढकल करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, बापूराव ढवळे, सखाराम भोरे, महेंद्र मोहळकर, प्रदीप पाटील यांनी तहसीलसमोर बुधवारी सकाळी उपोषण सुरू केले. गटविकास अधिकारी अतुल पाटील, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी माजी महसूल मंत्री सुरेश धस हजर होते. त्यांनी प्रशासनाला तातडीने टँॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत सांगितले.
तहसीलदार व गटविकास अधिकार्यांनी फक्राबाद, मतेवाडी, अरणगाव, बोर्ले, हळगाव, पिंपरखेड येथील प्रस्ताव प्राप्त असून बुधवारपासूनच टॅँंकरने पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले. इतर ग्रामपंचायतींचे जसजसे प्रस्ताव येतील, त्याप्रमाणे टॅँंकर चालू करण्यात येतील. कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीला माहिती पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावर समाधान झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले









